Monday, 17 August 2026

डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा

डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा
MT

भाजप नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम रखण्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच महामार्गाचे कामे रखडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबीन खान, शिर्डी : अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे नगर - मनमाड रस्त्याचे काम रखडले. त्याच्या अशा निर्णयामुळे लोकं दारू जास्त प्यायला लागले, तो वेडा माणूस असे म्हणत माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधत अजब दावा केला आहे. सुजय विखे यांच्या या विधानावर स्थानिक नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर - मनमाड महामार्गाचे सहा महिन्यापासून काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून शिर्डी ते अहिल्यानगर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आता तरी या मार्गाची साडेसाती संपेल, अशी नागरीकांना आशा होती. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ठ कामामुळे नागरीकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. नव्याने तयार झालेल्या महामार्गावर लगेच मोठ मोठाले खड्डे पडत आहेत. तर अनेक किमीचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.